'अक्षरा जन्मली तेव्हा सोनोग्राफी मशीन्सची चालती होती. मुलाच्या जन्मासाठीचे अट्टाहास होते. सगळीकडे अॅबॉर्शनच्या वार्ता होत्या. डोळ्यांनी दिसणारं आणि कानावर येणारं चित्र मला बदलता येईल का ? याची तगमग मनात होती. मुलीच्या जन्माचा जागर मी व्याख्यानातून मांडत होते, लिहीत होते.
बघता बघता ती एक वर्षाची झाली. तिचा वाढदिवस मुलीच्या जन्माचे स्वागत म्हणून स्त्रियांना प्रोत्साहनपर करावा असे वाटले. आज अक्षरयात्रींची चळवळ २५ वर्षाची झाली. संमेलनात अध्यक्षा, प्रमुख पाहुण्या, स्वागताध्यक्षा, संयोजिका या महत्वाच्या भूमिका स्त्रियांकडे आहेत. स्त्रियांचे प्रतिनिधित्व करणारे आणि मुलीचा वाढदिवस साहित्य संमेलनाने साजरा करणारे हे एकमेव संमेलन आहे. अक्षरक्रांतीच्या या चळवळीत आपण नेहमी सहभागी होता. म्हणूनच तर प्रबोधनाचं बळ येत. या….! आपल्या वाटेकडे आमचे डोळे लागले आहेत.
“स्नेहबंध दृढ कुठेतरी यास्तव आपुल्या भेटी काळजाच्या पायघड्या या आपुल्या येण्यासाठी…!”
जागतिक मातृभाषा दिनानिमित्त २१ फेब्रुवारी २०२३ रोजी अक्षरयात्री प्रतिष्ठानचे नेपाळ-भारत बहुभाषिक विश्व संमेलन दिमाखात संपन्न.
भारतीय दूतावास नेपाळ व अक्षरयात्री प्रतिष्ठान विटा जि.सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने काठमांडू येथे २१ फेब्रुवारी २०२३ रोजी नेपाळ-भारत बहुभाषिक विश्वसंमेलन मोठ्या दिमाखात संपन्न झाले. त्यानिमित्ताने मराठी, नेपाळी, मैथिली, अवधी, संस्कृत, हिंदी, भोजपुरी, ऊर्दू, नेपाळी, पंजाबी व इंग्रजी अशा १२ भाषेतील तीस कवींनी आपल्या कविता सादर केल्या. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य श्री. ज्ञानेश्वर मुळे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हे संमेलन काठमांडू येथे भारतीय दूतावासाच्या हॉलमध्ये संपन्न झाले.